लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : येथील प्रधान डाकघर कार्यालयाच्या वतीने ग्राहकांना एटीएम कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पोस्टाचे आर्थिक व्यवहार एटीएमद्वारे कोणत्याही ठिकाणी करणे शक्य होणार आहे. येथील पोस्ट कार्यालयाच्या वतीने पोस्टाचे एटीएम कार्ड वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीयकृत बँकेसह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममधूनदेखील पोस्टाच्या एटीएमद्वारे पैसे काढणे शक्य होणार आहे. पैसे काढल्यानंतर काढलेली रक्कम, शिल्लक रक्कम याबाबतचा संदेशदेखील संबंधित ग्राहकाला मिळणार आहे. बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी स्थानिक पोस्ट कार्यालयात एटीएम कार्ड मागणीचा अर्ज करावा लागणार आहे. तर जुने खाते असल्यास छायाचित्र, आधारकार्ड छायांकित प्रत, मतदान ओळखपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.सर्व पोस्ट कार्यालयांचे ‘बँकिंग नेटवर्किंग’ पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोणताही खातेदार कोणत्याही पोस्ट कार्यालयात पासबुकच्या आधारे व्यवहार करू शकतो. पैसे काढणे, पैसे भरणे हे व्यवहार करणे शक्य आहे. याशिवाय पोस्टाचे धनादेश बँकेप्रमाणे वेळेत ‘पास’ होण्यासाठी आवश्यक प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर पोस्टाच्या धनादेशाद्वारे बँकेप्रमाणे आर्थिक व्यवहार पूर्ण करणे शक्य होईल, असे पोस्ट मास्टर एस. डी. बोर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, बारामती पोस्ट कार्यालयाला प्रधान कार्यालयाचा दर्जा मिळाल्याने बारामती, इंदापूर, दौंडसह सासवड, जेजुरी परिसरातील ग्राहकांची सोय झाली आहे. खाते तपासणी, खाते निरीक्षण, केबल परवाना नूतनीकरण, बचत खाते दावा, वारसाचा दावा आदी प्रकरणे याच ठिकाणी मार्गी लागणार आहेत, असे बोर्डे यांनी सांगितले. ४१ पोस्ट कार्यालयातील ग्राहकांचे प्रश्न मार्गी लागतील. नोंद व्यवहारासाठी आधारकार्ड आवश्यक पोस्ट कार्यालयातील खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. यापूर्वी संपर्क न झालेल्या ग्राहकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. आधारकार्ड नोंद, वारसाची नोंद, मोबाइल क्रमांक नोंद पोस्टाच्या व्यवहारासाठी आवश्यक आहे.त्यामुळे ही माहिती न दिलेल्या ग्राहकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोस्ट मास्टर एस. डी. बोर्डे यांनी केले.
पोस्टाचे आर्थिक व्यवहार आता एटीएमद्वारे
By admin | Published: July 07, 2017 3:04 AM