प्रशांत बिडवे
पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील रीक्त पदांसाठी शैक्षणिक अर्हतेत बदल करीत शुक्रवारी दि. २१ राेजी शुध्दीपत्रक प्रसिध्द केले. त्यानुसार जर्नालिझम विषयात पदवी तसेच पदविकाधारकांसाेबत आता पदव्युत्तर पदवीधारकांनाही अर्ज करता येणार आहे. तत्पूर्वी जर्नालिझम विषयात पाेस्ट ग्रॅज्युएट झालेले उमेदवारांना अर्ज करता येत नव्हता. ‘दैनिक लाेकमत’ ने साेमवार दि. १७ राेजी पाेस्ट ग्रॅज्यूएट उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी द्यावी अशी बातमी प्रसिध्द केली हाेती.
लाेकमत मध्ये बातमी आल्यानंतर उशिरा शहाणपण सुचलेल्या राज्य शासनाने शैक्षणिक अर्हतेत बदल करण्याचा अभिप्राय आयाेगाला दिला. त्यानुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये जर्नालिझम विषयात पदव्युत्तर पदवी आणि पदविकासह सह एकुण १६ अर्हतेचा नव्याने समावेश केला. या निर्णयामुळे हजाराे पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागातील माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी ,जनसंपर्क अधिकारी यासह इतर पदांसाठी एमपीएससीने दि. ३० डिसेंबर २०२२ राेजी जाहिरात प्रसिध्द केली हाेती. मात्र, शैक्षणिक पात्रता अर्हता निकषामुळे अनेकांचे ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या हाेत्या. त्यानंतर दि. १० एप्रिल राेजी पुन्हा नव्याने शुध्दीपत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये त्यामध्ये पुन्हा मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, फिल्म टेलिव्हिजन आणि न्यू मिडिया विषयात पदवी तसेच पदव्युत्तर पदविका आदी १६ प्रकारच्या शैक्षणिक आर्हता ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. मात्र, मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम या विषयात पदव्युत्तर पदवी या शैक्षणिक अर्हतेचा उल्लेख केला नव्हता.
अर्जासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ
अर्ज करण्याची उमेदवारांना पूर्वी २५ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत दिली हाेती. मात्र, नविन शुध्दीपत्रकानुसार शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आला तसेच अर्ज करण्यासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.