पुणे : समाजाच्या सुख-दु:खांशी पोस्ट कार्यालय एकरूप झाले आहे. व्हॉट्स अॅपच्या जमान्यात पोस्टसेवाही अपडेट आहे. या सेवेचा गौरव म्हणून ९ आॅक्टोबर हा दिवस ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. ९ आॅक्टोबर १८८४ रोजी म्हणजेच सुमारे १३० वर्षांपूर्वी भारतीय पोस्टसेवेला सुरुवात झाली. दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत पोस्ट सेवेला भारतीय समाजाची जीवनवाहिनी समजले जात होते; परंतु आंतरदेशीय पत्र, पिवळे पोस्ट कार्ड या गोष्टी सध्याच्या फेसबुक आणि व्हॉट्स अॅपच्या जमान्यातील पिढीच्या गावीही नाहीत.कधी काळी पोस्ट कार्यालयात दोन पाळ्यांमध्ये काम चालत असे. यावरूनच पोस्ट कार्यालयाच्या कामाचा आवाका लक्षात येतो. त्या वेळी मनिआॅर्डर आणि तारसेवेला विशेष मागणी होती. आंतरदेशीय पत्र, साधे पत्र, पाकिटाला मोठी मागणी होती. रक्षाबंधनाच्या काळात तर राख्या पाठविण्यासाठी मोठी गर्दी होत असे. दिवाळी, नववर्ष काळात भेटकार्ड, शुभेच्छा कार्डांची अशीच अवस्था असे. त्या वेळी वर्षातून केवळ १२ सुट्ट्या पोस्टातील कर्मचाऱ्यांना मिळत असत. माहिती मिळविण्यासाठी अनेकांचा त्या वेळी पोस्ट कार्यालयात राबता असे. आंतरदेशीय पत्र, पिवळे पोस्ट कार्ड, मनिआॅर्डर या ‘फर्स्ट क्लास’ प्रकारातील काम सध्या १० टक्केही राहिलेले नाही. तर, ‘सेकंड क्लास’ प्रकारातील म्हणजे ‘बुकपोस्ट’चे काम जवळपास ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पोस्ट कार्यालयाला करावे लागत आहे. मात्र, ‘सेकंड क्लास’ कामांमुळे पोस्ट कार्यालयाच्या उत्पन्नात कोणत्याही प्रकारे वाढ होत नाही. पोस्ट कार्डावर अनुदान असल्यामुळे १ रुपया ६७ पैशांचे पोस्ट कार्ड पोस्ट कार्यालयाला ५० पैशांत विकावे लागते. तसेच, २५ पैशांची तिकिटे काही बुकपोस्टसाठी लागतात; मात्र चलनातून २५ पैसे केव्हाच गायब झाल्यामुळे त्याचाही फायदा पोस्टाला होताना दिसून येत नाही. मात्र, तरीही ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या पोस्टसेवेने काळानुरूप विविध योजना सुरू करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हॉट्स अॅपच्या जमान्यात पोस्टसेवाही अपडेट
By admin | Published: October 09, 2014 5:12 AM