पुणे : यंदाच्या रक्षाबंधनाला राख्या पाठविण्यासाठी पोस्टाने विशेष राखी पाकीट तयार केले असून, याची किंमत दहा रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक त्यांच्या राखी स्पीड पोस्टानेदेखील पाठवू शकतात. बहिणीने पाठवलेली प्रेमळ राखी प्रत्येक भावापर्यंत ती वेळेत पोहोचावी, यासाठी पोस्टाच्या पुणे विभागाने ही विशेष योजना तयार केली आहे.
या पाकिटातून तुम्ही राख्या पाठवू शकता. या पाकिटावर ५ रुपयांचा छापील स्टॅम्प असून, एका पाकिटाची किंमत १० रुपये आहे. शिवाय या पाकिटासाठी दर्जेदार कागद उपयोगात आणला गेला आहे. डिजिटल शुभेच्छांच्या युगात प्रत्यक्ष मिळालेली राखी आणि तीदेखील विश्वासार्ह पोस्टाकडून म्हणून तिचे महत्त्व जास्त आहे. बहिणीने मोठ्या प्रेमाने खरेदी केलेली राखी तितक्याच निगुतीने टपाल विभागाच्या राखी पाकिटामधून पाठविली जाणार आहे.
याबाबत पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले, ‘दरवर्षी या राखी पाकिटांना प्रचंड मागणी असते. ग्राहक त्यांच्या राख्या स्पीड पोस्टानेदेखील पाठवू शकतात. त्यामुळे परदेशातही राख्या अतिशय जलद आणि वेळेवर पोहोचू शकतील. यावर लिहिलेल्या ‘राखी’ या शब्दामुळे त्याचे सॉर्टिंग करणे सोपे होणार असून, त्या वेळेत पोहोचविण्यासाठी मोठ्या पोस्ट कार्यालयात पिन कोड नमूद केलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याबाबत सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. पुणे विभागातील पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जायभाये यांनी केले आहे.