पुणे : दि पुणे पोस्ट अॅण्ड टेलिकॉम को आॅप क्रेडीट सोसायटीचे २०१५ ते २०१७-२०१८ पर्यंतच्या कालावधीचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. संस्थेतील रोखीच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती सहकार विभागाने आयकर विभागाला कळविली असून, आपल्या खात्यामार्फत पुढील कार्यवाही करण्याचे सुचविले आहे. भारत संचार निगम लिमिटेड आणि पोस्टाच्या आरएमएस खात्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी वर्गाची ही पगारदार पतसंस्था असून, तिचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे. संस्थेचे सभासद गणेश तिखे यांनी संबंधित संस्थेची तक्रार सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर सहकारविभागाने या संस्थेच्या तपासणीसाठी पथक नियुक्त केले होते. त्यानुसार लेखापरीक्षकांनी केलेल्या तपासणीत सांस्कृतिक भवन, संस्था इमारत वापर, ठेवी व कर्जव्यवहार, वाहन वापर, नफा विभागणी, दैनंदिन शिल्लकीचे उल्लंघन, भेटवस्तू वाटप, हातावरील रोख शिल्लक रक्कमेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. रोखीने स्वीकारलेल्या ठेवी व कर्ज वसूली या कामातही अनियमितता दिसून येत असल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला.संस्थेच्या २०१७-१८मधील वैधानिक लेखापरीक्षण अहवालात अनियमितता झाली असल्याचा शेरा मारण्यात आला आहे. मात्र, यात संस्थेचे झालेले आर्थिक नुकसान, कर्ज, नियम व कमाल मयार्देचे व्यवहारातील उल्लंघन, संस्था पदाधिकाºयांच्या कर्ज मंजुरीबाबत सह्या नसलेली कर्ज प्रकरणे, कर्जदारांची सह्या नसलेली कर्ज प्रकरणे, प्राप्तीकर कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करुन केलेले रोखीचे व्यवहार याबाबत सुस्पष्ट तपशील नमूद न करता मोघम शेरे नोंदविले आहेत. या दोन्ही प्रकारावरुन संबंधित संस्थेच्या कामकाजात अनियमितता दिसून येत असल्याचा ठपका सहकार आयुक्तांच्या आदेशात ठेवण्यात आला आहे. त्यावरुन या संस्थेचे पुन्हा लेखापरीक्षण करावे असे आदेश सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिले आहेत. त्यासाठी विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख यांची नियुक्ती करावी, असे १४ आॅगस्टरोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. सहकार कार्यालयाने केलेल्या तपासणी अहवालात दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को आॅप क्रेडीट सोसायटीने संस्थेच्या कर्ज खात्यावर व ठेवीच्या रक्कमा रोखीने स्वीकारल्याचे दिसत आहे. संस्थेने प्राप्तीकर कायद्याचे उल्लंघन करुन रोखीने रक्कमा स्वीकारल्याचे तपासणी पथकाने नमूद केले आहे. या मुद्द्यांच्या मार्फत आपण योग्य ती कार्यवाही करावी असे पत्र अपर निबंधक (पतसंस्था) पी. एल. खंडागळे यांनी प्राप्तीकर विभागाच्या उपायुक्तांना पाठविले आहे.
पोस्ट-टेलिकॉम पतसंस्थेचे रोखीचे व्यवहार संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 8:54 PM
भारत संचार निगम लिमिटेड आणि पोस्टाच्या आरएमएस खात्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी वर्गाची ही पगारदार पतसंस्था असून, तिचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे.
ठळक मुद्देफेर लेखापरीक्षणाचे सहकार विभागाचे आदेश प्राप्तिकर विभागालाही व्यवहारांची दिली माहितीरोखीने स्वीकारलेल्या ठेवी व कर्ज वसूली या कामातही अनियमितता दिसून येत असल्याचा ठपका