पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी विद्यापीठातील ८ प्राध्यापक इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत कुलगुरुपदाचे अर्ज स्वीकारले जाणार असल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात कुलगुरुपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी काम करण्याची संधी मिळावी, अशी शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींची इच्छा असते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ येत्या १५ मे रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे नवीन कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन करण्यात आली. या समितीने कुलगुरुपदासाठी येत्या १० एप्रिलपर्यंत अर्ज मागविले आहेत. त्यानुसार प्राध्यापकांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यापीठाला कुलगुरू म्हणून विद्यापीठामधील व्यक्ती की विद्यापीठाबाहेरील व्यक्ती मिळणार, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.
कुलगुरू पदासाठी ८ प्राध्यापक इच्छुक
By admin | Published: March 31, 2017 3:25 AM