लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना पोस्टल मतपत्रिका द्वारे मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली आहे. परंतु या मतदारांना अद्यापही पोस्टल मतपत्रिका साठी करावयाचा अर्ज देखील निवडणूक यंत्रणेकडून उपलब्ध झालेला नाही. अथवा उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना पर्यंतही याबद्दलची माहिती नसल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. तसेच मतदार यादी देखील वेळेत प्रसिद्ध झाली नाही. यामुळेच कोरोना रुग्णांसाठी १८ नोव्हेंबर पूर्वी पोस्टल मतपत्रिका साठी अर्ज करावयाचा होता. परंतु
आता मुदत संपल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि ६५ वर्षापेक्षा वरील ज्येष्ठ मतदार पोस्टल मतदान करू शकतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक आयोगाने अधिक खबरदारी घेत कोरोना पॉझिटिव्ह आणि ६५ वर्षावरील ज्येष्ठ मतदारांना पोस्टल मतदान करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच मतदानच्या दोन-तीन दिवस आगोदर पाॅझिटिव्ह येणा-या मतदारांना देखील मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी शेवटच्या एक तास कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. परंतु या सर्व गोष्टींबाबत प्रशासनाच्या पातळीवरच गोंधळ असल्याचे समोर आले आहे.
--------
मतदार यादीत गोंधळच गोंधळ
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये एकच नाव पाच ते दहा वेळा प्रसिध्द झाल्याचा प्रकार घडकीस आला आहे. दुबार नावांची संख्या तर प्रचंड असून, जिल्ह्यातील उमेदवार याद्या उघडताच अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
मतदार यादी क्रमांक २३ मध्ये एक नाव तब्बल दहा वेळा दिसून आले आहे. काही ठिकाणी एकच नाव पाच वेळा छापल्या चे प्रकार घडले. एकाच व्यक्तीचे दोन वेळा नाव असणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. ऑनलाइन मतदार नोंदणी साठी आलेल्या अर्जाची पडताळणी आणि छाननी नीटपणे न केल्याने मतदार याद्या सदोष छापले गेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली तरी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाही. यामुळेच मुळे मतदार यादी आणि पुरवणी मतदार यादी यामधील मतदारसंघाचा ताळमेळ देखील पुणे जिल्ह्यामध्ये नीटपणे घालता आला नाही. यामुळेच मतदार याद्या सदोष झाल्या आहेत.
--
पुणे जिल्ह्यातील मतदार यादीसंदर्भात उमेदवारांनी तक्रारी केल्या आहेत. चुकीची नावे मतदार यादीत असल्याने एका उमेदवाराने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. उमेदवार यादीमध्ये नावांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याने प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदार याद्या बरोबरच मतदाराने मतदार नोंदणीसाठी केलेला मूळ अर्ज देखील मतदान केंद्रावर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयात केली आहे.