पुणे : नोटाबंदीमुळे कोणत्याही बँकेला नियमानुसार खात्यातून पैसे देता आले नाहीत. मात्र, पोस्टातून जवळपास २४ हजार रुपये आठवड्याला मिळत असल्याने तेथे खाते काढण्याचा वेग वाढला आहे. केवळ पुणे स्टेशन येथील जीपीओ कार्यालयात महिनाभरात साडेपाचशेहून अधिक नवीन खाती उघडली गेली आहेत.केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नवीन पाचशे व दोन हजारांच्या नोटांसह शंभराच्या नोटा मिळविण्यासाठी नागरिकांची अक्षरश: बँका व एटीएम केंद्रांबाहेर झुंबड उडाल्याचे चित्र दिसून येत होते. आरबीआयने प्रत्येक बचत खातेदाराला आठवड्यातून २४ हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर ४० दिवस उलटले, तरी बँकांना तितके पैसे अजूनही देता येत नाहीत. काही सहकारी बँकांमध्ये तर खातेदारांना पाचशे रुपये हातावर टेकविले जात आहेत. इतकेच काय, तर बड्या राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनाही खातेदारांना २ ते ६ हजार रुपयेच द्यावे लागत आहेत. चालू खातेदारांना ५० हजार रुपये आठवड्याला काढण्याची मुभा आहे. मात्र, या खातेदारांनादेखील बहुतांश बँका १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम देत नाहीत.मात्र, पोस्ट खात्यातील खातेदार याला अपवाद ठरले आहेत. ऐन चलनटंचाईच्या काळातदेखील येथील खातेदारांना त्यांच्या खात्यातून २४ हजार रुपयांची रक्कम आठवड्याला देण्यात आली. त्यामुळे एकाच महिन्यात साडेपाचशेहून अधिक खाती उघडली गेली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नोटाबंदीने पोस्टाला भाव
By admin | Published: December 23, 2016 1:03 AM