पुणे : शासनाच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजनेअंतर्गत शिवसेनेचे एक पोस्टर सध्या टीकेचा विषय बनले आहे. या पोस्टरमध्ये नागरिकांना काही औषधांची नावे सुचवण्यात आली आहेत. भारताच्या ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा- १९४० आणि १९४५ यांचे हे गंभीर उल्लंघन आहे, याकडे इंडियन मेडिकल असोसिएशनने लक्ष वेधले आहे. हे पोस्टर त्वरित मागे घेऊन प्रतिबंधात्मक बाबींवर जोर द्यावा. औषधाचा भाग प्रमाणित डॉक्टरांना हाताळू दयावा, अशी मागणी आयएमएतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.
मुंबईत शिवसेनेच्या नगरसेविकेकडून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेबाबत पोस्टर लावण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास काय औषधे घ्यावीत, हे नमूद करण्यात आले आहे. सर्दी, खोकला, श्वसनास त्रास अशा प्रत्येक त्रासासाठी औषधांची नावे देण्यात आली आहेत. याबाबत आयएमने आक्षेप नोंदवला आहे.
सर्व औषधे डॉक्टरांकडूनच लिहून द्यायची प्रिस्क्रिप्शनची औषधे आहेत. नागरिकांमध्ये आपल्या मनानेच औषध घेण्याच्या चुकीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल, ज्याचे व्यापक दुष्परिणाम होऊ शकतात. या औषधांची जाहिरात करणे भारत सरकारच्या कायद्याच्या आणि धोरणाच्या विरोधात आहे. ही औषधे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या अधिकृत चिठ्ठीद्वारेच घ्यावी लागतात. बरीच औषधे त्यांच्या ब्रॅडच्या नावाने दर्शवली आहेत. यामुळे त्या औषध कंपन्याही अडचणीत येऊ शकतात, याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने भाष्य केले आहे.
--------
काय आहे आयएमएचे म्हणणे?
* पोस्टरमध्ये लिहिलेल्या औषधांचे डोस योग्य नाहीत.
* या पोस्टरमध्ये दर्शविलेले डेक्झामेथाझोन हे एक स्टिरॉइड आहे आणि डॉक्टरांच्याच सल्ल्याने त्याचा वापर करावा लागतो. पोस्टरमध्ये त्याची वेळ संध्याकाळी दिली गेली आहे जी चुकीची आहे.
* मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस, जीईआरडी आणि जठराची सूज असलेल्या व्यक्तींनी ही स्टिरॉइड्स घ्यायची नसतात. त्याचे अतिशय गंभीर परिणाम उद्भवू शकतात.
* या पोस्टरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा ('लोगो दाखवला आहे. अशा सार्वत्रिक मोहिमेत आणि चुकीच्या निर्देशामध्ये परवानगीविना लोगो वापरणे आक्षेपार्ह ठरू शकते.