लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एके काळी आनंद, दु:ख, यशाच्या वार्ता स्नेहीजनांपर्यंत पोचविणारे पोस्टमन काका बदलत्या काळात मागे-मागे पडत चालले आहेत. सायकल चालवीत येणारा खाकी रंगाच्या कपड्यातील पोस्टमन काका, हे चित्र काळाच्या ओघात हरवत चाललंय. त्यांची ओळख मुलांना व्हावी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने पोस्टमन काकांना चक्क पोस्ट कार्डाच्या राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.निरंजन सेवाभावी संस्थेच्या सिद्धीता गटातर्फे पोस्टाच्या मुख्य कार्यालयात (जीपीओ) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपडाकपाल अश्विनी पोतदार, वरिष्ठ डाकपाल आर. एस. गायकवाड, रेखा भळगट, डॉ. प्राजक्ता कोळपकर, शुभांगी धूत, पूनम राठी, रेश्मा भट्टड, पूजा पाटील, वैशाली कासट, प्राजक्ता डागा, भारती होले, अनिता मुंदडा, माधुरी तुपे, पूजा भुतडा, संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट आदी उपस्थित होते. या वेळी पोस्टमन काकांना भेटवस्तू देण्यात आल्या. शुभांगी धूत म्हणाल्या, की आंतरदेशीय पत्र, पिवळसर पोस्टकार्ड, लाल रंगाच्या पत्रपेट्या आणि पत्ररूपी संवादाच्या काळात पोस्टमन काका सर्वांच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक होते.पोस्ट खात्याचे काम कमी झाले असले, तरी आजही अनेकदा पत्रव्यवहारांसाठी पोस्टमनशिवाय पर्याय नसतो. पोस्टमन गौतम वाव्हळ म्हणाले, की आजच्या काळात मोबाईलमुळे पत्रव्यवहार कमी झाला असून पोस्टमनचे महत्त्वही हळूहळू कमी होऊ लागले आहे. परंतु, आमची आठवण ठेवून आमच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केल्याबद्दल खूप आनंद झाला आहे.
पोस्टमन काकांना पोस्टकार्डाची राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 3:33 AM