पुणे-कसब्यात पराभव का झाला याचे मुल्यमापन आम्ही केले आहे. ते आमच्यापर्यंत आलेही आहे. त्यावर आता योग्य ती कारवाई केली जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी राजकारण करू नये, थोडे तरी संवेदनशील रहावे असे ते म्हणाले.
एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कसब्यातील भाजपच्या पराभवानंतर ते प्रथमच पुण्यात आले होते. त्यांच्यासमवेत प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे व अन्य काही पदाधिकारी होते. फडणवीस म्हणाले, एखादी निवडणूक हरल्यानंतर फार काही फरक पडतो असे मी मानत नाही, मात्र कोणत्याही निवडणुकीतील जय पराजयानंतर आम्ही त्याचे मुल्यमापन करतो. कसब्यातील पराभवाचे तसे पोस्टमार्टे झाले आहे. त्यावरून योग्य ती कारवाई केली जाईल.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत अशा विरोधकांची तक्रार असल्याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी सांगितले की दोनच दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला. तत्काळ पंचनाम्यांचे आदेश आम्ही दिले. आता त्याची कारवाई सुरू झाली आहे, त्याला थोडा काळ तरी लागेल. तरी आम्ही सांगितले आहे की फोटो काढून पाठवला तरी तो पंचनामा समजला जाईल. विरोधकांचे मला आश्चर्य वाटते, त्यांच्या काळातील पैसे आम्ही आता देत आहोत, व ते रात्री पडलेल्या अवकाळी पावसाचे पैसे सकाळी मागत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किंवा आपत्ती, अतीवृष्टी अशा विषयांवर विरोधकांनी थोडे संवेदनशील राहणे गरजेचे आहे, त्यावर राजकारण करू नये.