पुणे: कोरोनााच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागील वर्षी महाविद्यालयीन शुल्कवाढीला स्थगिती देण्याचा घेतलेला निर्णय २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कायम केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असला, तरी शिक्षण संस्था चालकांच्या अडचणीत वाढ होणार आहे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयाच्या शुल्कात तब्बल १३ वर्षांनी सुमारे ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे शुल्कवाढीच्या निर्णयाला मागील वर्षी स्थगिती द्यावी लागली. कोरोना परिस्थितीत यावर्षी सुध्दा फारशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने शुल्कवाढीला दिलेली स्थगिती २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी सुध्दा कायम ठेवली आहे. मात्र, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून वाढीव शुल्काची अंमलबजावणी केली जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांच्या शुल्क कपातीचा निर्णय नुकताच जाहीर केला. विद्यार्थ्यांकडून वापरल्या जात नसलेल्या सोई-सुविधांचे शुल्क महाविद्यालयांनी आकारू नये, असे मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यामुळे ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना आदींचे शुल्क कमी करण्यात आले. परिणामी, महाविद्यालयांकडे शुल्काच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे प्राध्यापकांचे वेतन कसे करावे, असा प्रश्न विनाअनुदानित माहविद्यालयांसमोर उभा राहिला आहे.