दौंड : शहरातील अष्टविनायक रस्त्यालगतचे बेकायदेशीर अतिक्रमण काढून रस्ता नियमानुसार करण्यात यावा, या मागणीसाठी तीन दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण गुरुवारी तहसीलदार संजय पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
डॉ. बासाहेब आंबेडकर ते नवयुग शिक्षण संस्था या परिसरातील अतिक्रमण काढून अष्टविनायक रस्ता कायदेशीरपणे विस्तारित झाला पाहिजे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार, संजय जाधव, शामसुंदर सोनवणे यांनी नगर परिषदेच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांची तहसीलदार संजय पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली. तसेच नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम खात्याला पाठवलेले पत्र आंदोलकांना देण्यात आले. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, १ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी आहे. शासन नियमानुसार या कालावधीत शासकीय, निमशासकीय, खासगी अतिक्रमणे काढता येत नाही. तसेच या रस्त्या संदर्भातील किरकोळ फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे. नियमानुसार रस्त्यासाठी ११ मीटर रुंदीकरिता जागा उपलब्ध होत नसल्याने तूर्त तरी रस्त्याचे काम बंद ठेवले जाईल. तसेच ११ मीटर रुंदीचा भाग प्रत्यक्ष ताब्यात मिळेल, त्यावेळेस या रस्त्याचे काम करण्यात यावे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना आंदोलक म्हणाले की, अष्टविनायक रस्त्याचे काम ३० सप्टेंबरनंतर नियमात करावे. सध्याच्या परिस्थितीत रस्त्याचे काम सुरू केल्यास आम्ही पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक आश्वासन आंदोलकांना दिल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, गटनेते बादशाह शेख, इंद्रजित जगदाळे, सुनील शर्मा, स्वप्निल शाह, सचिन कुलथे, फिरोज खान, नगरपरिषदेचे अधिकारी जिजाबा दिवेकर उपस्थित होते.
२९ दौंड उपोषण