कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.या कालावधीत वारंवार परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची नावे दर आठ-पंधरा दिवसांनी महाविद्यालयाकडे अंतर्गत गुण भरण्यासाठी पाठविली जात होती. कोरोना काळात प्राध्यापकांनी महाविद्यालयात येऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांचे गुण भरण्याचे काम पूर्ण केले. मात्र, अनावधानाने एक ते दोन विद्यार्थ्यांचे गुण भरण्याचे राहून गेले. त्यामुळे विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकांना विद्यापीठात प्रमाद समितीसमोर चौकशीसाठी बोलवले.त्यामुळे प्राध्यापक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली.
कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्राध्यापकांनी विद्यापीठाला सर्वोतोपरी सहकार्य केले. काही तांत्रिक कारणास्तव किंवा अनावधानाने प्राध्यापकांकडून गुण भरताना तृटी राहून गेल्याने थेट त्यांना परीक्षा विभागात बोलावून घेणे योग्य नाही. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात गर्दी करणे उचित नाही. यामुळे विद्यापीठाने या प्रक्रियेस तात्काळ स्थिगिती द्यावी, अशी मागणी प्रध्यापक संघटनेने केली. तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये एकाही प्राध्यापकावर कारवाई केली जाणार नसल्याचा ठराव झाला होता. तरीही कारवाई केली जात असल्याने प्राध्यापक संघटनेने आश्चर्य व्यक्त केले. तसेच केवळ प्राध्यापकांकडूनच नाही तर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूनही चूका होतात. त्यावेळी कारवाई केली जात का? असा सवालही प्राध्यापक संघटनेच्या पदाधिका-यांनी उपस्थित केला.