पिंपरी : पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकत कर थकविल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्यावरून महापालिकेच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शनिवारी वेगाने घडामोडी घडल्या आणि संबंधित नोटिशीला मंगळवारपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
गिरीश प्रभुणे यांची चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती ही संस्था आहे. तसेच क्रांतिवीर चापेकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय त्याचप्रमाणे समरसता पुनरुत्थान गुरुकुलम शाळा देखील आहे. त्यात क्रांतिवीर चापेकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचा एक कोटी २१ लाख सात हजार ३४० रुपये मिळकत कर थकीत आहे. तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या मिळकतीतील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम शाळेच्या अनधिकृत इमारतीच्या मिळकत करापोटी एक कोटी ७७ लाख ५९ हजार १४२ रुपये थकबाकी आहे. दोन्ही मिळकतींच्या करापोटी दोन कोटी ९८ लाख ६६ हजार ४८२ रुपये थकबाकी आहे. याबाबत महापालिकेकडून प्रभुणे यांच्या संस्थेला १३ जानेवारी २०२१ रोजी नोटीस बजावण्यात आली होती.
दरम्यान, गिरीश प्रभुणे यांना २५ जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे त्यांना महापालिकेकडून बजावण्यात आलेल्या नोटीसचा मुद्दा चर्चेत आला. विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत शनिवारी पत्र देऊन खेद व्यक्त केला. या संस्थेची फाईल शैक्षणिक समितीकडे पाठवून कर कमी करता येईल का, याचा विचार करावा. तसेच याबाबत तत्काळ तोडगा काढावा, असे निर्देश गोऱ्हे यांनी महापालिकेला दिले. नदीच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे नियमित होत नाहीत. मात्र प्रभुणे यांच्या संस्थेचा खास बाब म्हणून विचार करावा, अशी सूचना राज्य शासनाला करणार आहे, असेही गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.
संबंधित संस्थेने कागदपत्रे सादर करावित, असे महापालिकेकडून सूचित केले होते. मात्र त्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच मिळकत कराच्या नोटीसीवर हरकत घेतली नाही. त्यांच्या मिळकत जप्तीची मुदत संपत आली आहे. त्यामुळे संबंधित संस्थेला बजावण्यात आलेल्या नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे. - स्मिता झगडे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका