देहरोड (पुणे) : देहूरोड, कॅन्टोन्मेंटच्या सर्वसाधारण सभेत कॅन्टोन्मेंट पालिकेत विलीनीकरण करण्यास संरक्षण विभागातील वरिष्ठ कार्यालयाकडून स्थगिती दिली आहे, अशी माहिती कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच यांनी सभेत दिली. तसेच विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. देहूरोड बाजारपेठेत आवश्यक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष ब्रिगेडियर कटोच यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, नामनिर्देशित सदस्य ॲड. कैलास पानसरे, अमित रोहतगी उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी पद प्रतीक्षा यादीप्रमाणे भरण्यास मान्यता देण्यात आली. स्थानिक आमदार निधीतून मारुती मंदिरासमोर सभागृह बांधण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मंजुरी देण्यात आली. कॅन्टोन्मेंट व्यापारी संकुलातील गाळे भाडे तत्त्वावर देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
कॅन्टोन्मेंटचे नाके भाडेतत्त्वावर देणार :
कॅन्टोन्मेंटचे शितळानगर, शंकरवाडी सोमाटणे फाटा येथील नाके आणि मोकळी जागा आणि प्रमुख चौकात होर्डिंग भाडे तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. देहूरोड बाजारपेठेत सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने पे ॲण्ड पार्क संकल्पना राबविणे आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. कोटेश्वरवाडीत व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र. कोटेश्वरवाडीतील सरदार उमाबाई दाभाडे शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंद केली आहे, शाळेच्या इमारतीचा वापर गावातील इच्छुकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी मांडला. त्यास अध्यक्षांनी सहमती दर्शविली. स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली.
विकासकामांना दिली मंजुरी
थॉमस कॉलनीत भूमिगत गटारे बांधणे (४० लाख), मामुर्डी ते शगुण सोसायटी रस्ता डांबरीकरण (३१ लाख ९५ हजार), एमबी कॅम्प शाळा रस्ता (१५ लाख ३५ हजार), इंद्रायणी दर्शनमधील कंपोस्ट खत प्रकल्प रस्ता (४ लाख ६ हजार), सिद्धिविनायकनगरी रस्ता (१२ लाख ४५ हजार), चिंचोली उद्यान विकसित करणे (१७ लाख), बायोमेडिकल वेस्ट उचलण्यासाठी (१ लाख ६९ हजार) तर हिंदू ख्रिश्चन स्मशानभूमीत जीआय पाइप खरेदी (१ लाख ९१ हजार) या प्रस्तावांना मंजुरी दिली.