पुणे : टपाल विभागातील भरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्ती झाल्यानंतर निवडप्रक्रियेला स्थगिती दिल्याने राज्यभरातील अंध उमेदवारांनी पुणे स्टेशनजवळील टपाल विभागाच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. नियुक्तिपत्र दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या वतीने मार्च २०१५साली मल्टिटास्कींग स्टाफ व पोस्टमन या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यातील २ हजार ४३३ यशस्वी उमेदवारांपैकी पाचशे उमेदवारांची निवड मे २०१६ साली झाली. त्यात अस्थिव्यंग, अंध अशा प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांचादेखील समावेश होता. दिव्यांग व्यक्ती टपाल विभागाच्या विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवत असल्याचे प्रहार अपंगक्रांतीच्या सुरेखा ढवळे यांनी सांगितले. टपाल विभागातील नोकरीमुळे अनेकांनी या पूर्वीची नोकरी सोडलेली आहे. त्यामुळे अपंग उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे. पात्र ठरल्यानंतर काही महिने सेवादेखील केली आहे. त्यानंतर अचानकपणे केलेल्या कारवाईमुळे अपंग उमेदवारांनी संताप व्यक्त केला. प्रहार अपंग क्रांतीचे धर्मेंद्र सातव, रफीक खान, हरिदास शिंदे, ऋषीकेश शार्दुल, नीलेश महाशब्दे या वेळी उपस्थित होते.
नियुक्तीनंतर भरतीला टपाल विभागाची स्थगिती
By admin | Published: November 17, 2016 4:25 AM