पुणे: सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गाचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या विशेष प्रवेश फेरीस स्थगिती दिली आहे. परिणामी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसह यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करून ईसीडब्लू प्रवर्ग निवडून प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार पुण्यात पहिल्या विशेष फेरी अंतर्गत अर्ज स्वीकारण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार अॅलोटमेंट लिस्ट प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, शासनाने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गातून प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे विशेष फेरी स्थगिती करण्यात आली. तसेच प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
सुधारीत विशेष फेरीचे वेळापत्रकही शिक्षण विभागाने प्रसिध्द केले असून विद्यार्थी येत्या २६ डिसेंबर रोजी प्रवेश अर्जातील पहिल्या भागात दुरूस्ती करू शकतील. विद्यार्थ्यांना ईडब्लूएस किंवा खुला प्रवर्ग निवडता येईल. तसेच २७ डिसेंबर रोजी प्रवेश अर्जाच्या दुस-या भागात विद्यार्थी पसंतीक्रम बदलू शकतील. तर २८ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांची अॅलोटमेंट लिस्ट प्रसिध्द करून २९ ते ३० डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.