जिल्ह्यात सध्या सर्वत्र थंडी पडत आहे. पिकांसाठी हे पोषक वातावरण आहे. वातावरणात होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवून लागवडीपासून काढणीपर्यंत खते औषध, फवारणी, खुरपणी केल्यास पीक अधिक जोमाने येऊ शकते असे कडूस येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु पारंपरिक पिकांना फाटा देऊन शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने बटाटा पिकाची लागवड करत शेतकऱ्यांनी बटाटा पिकांचे क्षेत्र वाढवले आहे.
कडूस, गारगोटवाडी, कोहिंडे बुद्रुक, सायगाव, वेताळे, दोंदे परिसरात बटाटा पिकाचे हब तयार झाले आहे.
बटाटा मुळात थंड भागांत येणारे पीक आहे.
खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात हे पीक घेतले जाते. कडूस, कोहिंडे, परिसरात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असते.
कडूस (ता. खेड) भागात यावर्षी बटाट्याचे पीक विक्रमी होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.