सातगाव पठार येथील कुरवंडी ते पारगावदरम्यान असणाऱ्या भागात शेतीत पावसाळी बटाट्याची लागवड केली जाते.
सुरुवातीला चांगला पाऊस पडला आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने सध्या सर्वत्र पहावे तिकडे शेतात बटाटा लागवड करताना शेतकरी दिसत आहे. मजुरांचा तुटवडा असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने सर्व शेतकरी बटाटा लागवड करत आहेत, अशी माहिती कोल्हारवाडी येथील शेतकरी जयसिंग एरंडे यांनी दिली. ट्रॅक्टरने बटाटा लागवड करत असल्याने एकरी दोन हजार रुपये बटाटा लागवड मजुरीसाठी येणारा खर्च व वेळ वाचून शेतकरी हे काम ट्रॅक्टरच्या मदतीने करत आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून बैलांपासून शेती करणे व लागवड करणे बंद झाले आहे. सर्रास लहान-मोठे शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्यानेच लागवड करत आहे.
बटाटा बियाणे बाजारभाव तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर आहे. खतांचा दर वाढला आहे. पूर्वी बटाटा लागवड म्हटले की, १५ ते २० मजूर, बैल, औतासह शेतकरी कुटुंब असा शेतात गर्दीचा माहोल दिसत होता. परंतु पारंपरिक पद्धतीने बटाटा लागवड आता कालबाह्य झाल्याने प्रत्यक्ष शेतात बटाटा लागवड मशीनद्वारे व दोन घरातील व्यक्ती असे थोडक्यात करतानाचे चित्र शेतात दिसत आहे. कुरवंडी ते पारगाव या सातगावात सर्वत्र बटाटा लागवड कामे चालू आहेत. निवडलेले बटाटे बियाणे चिरून त्याच्या खापा ह्या पोत्याद्वारे मशीनमध्ये भरून त्याची लागवड सरीमध्ये मशीनद्वारे करण्यासाठी दोन शेतकरी शेजारी बसून बियाणे त्या चाळणीतून टाकतात. बियाणे योग्य प्रकारे जमिनीत पडते की नाही हे पहिले जाते. त्या चाळणीत बटाटे बियाणे संपण्यापूर्वी लगेच उपलब्ध बियाणे मशीनमध्ये टाकले जाते. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. बटाटा लागवड वेगाने सुरू असल्याची माहिती शेतकरी अशोक बाजारे तसेच हुंडेकरी व्यावसायिक राम तोडकर यांनी दिली.