पुणे : पावसाच्या संततधारेने नागरिक सुखावले असले, तरी शहरातील रस्त्यांनी मात्र लगेचच मान टाकली आहे. लहानमोठ्या खड्ड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, महापौर प्रशांत जगताप यांनी मात्र हे प्रमाण फार नसल्याचा दावा केला.तक्रार आली, की लगेच खड्डे बुजवले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात खड्डे बुजविण्यासाठी मोबाईल पथके तयार करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याने विशेषकरून दुचाकीस्वारांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. दीड-दोन महिन्यांपूर्वी उद््घाटन झालेल्या जेधे उड्डाणपुलावरही खड्डे पडू लागले आहेत. याशिवाय, गल्लीबोळांतील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत.मोबाईल कंपन्यांनी खोदाई केलेले काम व्यवस्थित न बुजविल्यामुळे त्यातील खडी, माती पावसाच्या पाण्याने बाहेर पडून काही ठिकाणी चिखलही झाला आहे. महापालिकेच्या रस्त्यांच्या कामाचा निकृष्ट दर्जाच पावसामुळे उघड होत आहे. तरीही महापौरांनी पावसाच्या तुलनेत खड्डे फार नसल्याचा दावा केला. तक्रारींचे प्रमाण अत्यंत कमी आहे, असे महापौर म्हणाले. तरीही तक्रार येताच त्वरित काम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सतत पाऊस पडत आहे. अशा पावसात डांबरी रस्ते तग धरीत नाहीत. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत; पण त्याचे प्रमाण फार नाही, असे ते म्हणाले. येत्या आठवडाभरात खड्डे बुजवण्यासाठी फिरते पथक सुरू करीत आहोत. अशी चार पथके असतील. ती पाहणी करून खड्डे दिसतील तेथे लगेचच ते बुजविण्याचे काम करतील, असे महापौरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खड्डे फार नाहीत : महापौर
By admin | Published: July 12, 2016 2:08 AM