लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाकाळात जिवावर उदार होऊन काम करत असूनही साधी सुरक्षा साधने पुरवत नसल्याच्या निषेधार्थ वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने हे आंदोलन केले.
राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कल्याण, पनवेल, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या विभागांतील कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.
संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले की महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांवर प्रशासन सातत्याने अन्याय करत आहे. रिक्त जागांवर कंत्राटी कामगार घेतले जातात. त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतात. पूर्ण वेतन दिले जात नाही. ब्रेक देऊन कामावर घेतले जात असल्याने अनेक वर्षे काम करूनही हे कामगार कंत्राटीच राहिले आहेत. त्यांना डावलून कायम नोकरीवर भरती होत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन दखल घ्यायला तयार नाही, त्यामुळे संघटना आता आंदोलन तीव्र करण्याच्या विचारात आहे.