पुणे: मराठी भावगीत आणि चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा घडविण्याची ताकद आजच्या नव्या पिढीच्या तरुण गीतकार आणि संगीतकाराकडे निश्चित आहे. जुना संपन्न सांस्कृतिक वारसा जपत नव्या पाऊलखुणा शोधत , हे कलावंत संगीताचा नवा इतिहास घडवित आहेत, असा आशावाद चित्रपट गीतकार अरविंद जगताप यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ चित्रपट संगीत लेखक मधू पोतदार यांच्या ‘गानगोष्टया’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे प्रमुख राज्यमंत्री दर्जा असलेले शेखर चरेगावकर, नाविन्य प्रकाशनचे नितीन खैरे,लोकमंगल ग्रूप शिक्षण संस्थेचे शिरीष चिटणीस उपस्थित होते. जगताप म्हणाले, माध्यमाच्या बदलत्या युगात संगीत कात टाकत असून, त्यात संगीताचे नव नवीन प्रवाह एकत्र येवून एका समृध्द अशा वाटचालीकडे प्रवास चालू आहे. संगीताचा चेहरा जरी बदलला तरी आत्मा तोच आहे. गानगोष्टी सारख्या पुस्तकाने मराठी चित्रपट आणि भावसंगीताच्या इतिहासाचे केलेले हे दस्ताऐवजीकरण खूप मोलाचे आहे. अध्यक्षीय भाषणात शेखर चरेगावकर यांनी याप्रकारच्या पुस्तकांचे संदर्भ मूल्य खूप मोठे आहे आणि हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचायला हवे याकरिता सकारात्मक प्रयत्न व्हायला हवेत. तसेच अशा प्रकारच्या पुस्तकांना लोकमान्यते सोबत राजमान्यता मिळविण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पुस्तकाचे लेखक मधू पोतदार पुस्तकामागची भूमिका विशद करताना म्हणाले, मराठी भावसंगीत समाजाशी किती एकरूप झाले आहे याचा प्रत्यय पदोपदी मिळत गेला. वाचकांच्या प्रतिसादातूनच हे पुस्तक घडत गेल्याने मी पुस्तक हे मराठी रसिकांना अर्पण केले आहे. धनंजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
नव्या पिढीमध्ये चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ घडविण्याची ताकद : अरविंद जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 2:18 PM
संगीताचा चेहरा जरी बदलला तरी आत्मा तोच आहे....
ठळक मुद्देज्येष्ठ चित्रपट संगीत लेखक मधू पोतदार यांच्या ‘गानगोष्टया’ पुस्तक प्रकाशन समारंभ