पुणे : दु:ख हे प्रत्येकाच्याच वाट्याला येते. ते चुकणारे नाही. मात्र, हे दु:ख विसरायला लावण्याची ताकद विनोदात आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी येथे व्यक्त केले. राम नगरकर कला अकादमीतर्फे दिला जाणारा पहिला राम नगरकर गौरव पुरस्कार आज त्यांच्या हस्ते कलाकार भाऊ कदम यांना देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी एकपात्री कलाकार बंडा जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, नाट्यपरिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, वंदन नगरकर उपस्थित होते. मिरासदार म्हणाले, ‘‘दु:ख विसरायला लावण्याची शक्ती अध्यात्मातही आहे; पण ते सर्वसामान्यांसाठी नाही. विनोद हा मात्र सर्वसमावेशक आहे. हे ज्यांना ओळखता आले, त्यांना यश मिळाले. राम नगरकरांबद्दल बोलताना ते म्हणाले, की त्यांचे वैशिष्ट्य हे होते की ते स्वत:वर विनोद करायचे. स्वत:वर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ असतो. नगरकरांचा विनोदही असाच निरागस होता. त्याची तुलना त्यांनी चिं. वि. जोशींच्या विनोदाशी केली. मी रामभाऊंना पहिल्यांदा ‘विच्छा माझी पुरी करा’मधे पाहिले. अशी आठवण त्यांनी सांगितली. तेम्हणाले, की ते नाटक पूर्णपणे दादा कोंडके यांचे होते. तरीही त्यात रामभाऊ लक्षात राहायचे, हे त्यांचे मोठेपण. मी रामभाऊ यांच्याबरोबर नाटकाचे सुमारे दोन हजार प्रयोग केले. त्यांनी मला हजरजबाबीपणा आणि टायमिंग शिकवले, असे सुहासिनी देशपांडे यांनी सांगितले. तर सुरेश देशमुख यांनी त्यांच्या उत्स्फूर्ततेचा उल्लेख केला. वंदन नगरकर यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. तर संध्या नगरकर यांनी आभार मानले. यानंतर बंडा जोशी, वंदन नगरकर, योगेश सुपेकर, यांचे एकपात्री प्रयोग तसेच सारेगमप विजेती जुईली जोगळेकर हिच्या गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. (प्रतिनिधी)
विनोदात दु:ख विसरायची शक्ती
By admin | Published: June 14, 2014 1:19 AM