पुणे : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आणि धरसोडवृत्तीची आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याविषयी स्पष्टपणे भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. या मुद्यावर शिवसेना गोंधळलेली असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
पुणे दौऱ्यावर आलेल्या दरेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते. नामकरणास महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला असून संजय निरुपम यांनीही हे सरकार आमच्यामुळे असल्याचे वक्तव्य करीत इशाराच दिला आहे. तर, मंत्री अशोक चव्हाण यांनी हा विषय आमच्या अजेंड्यावर नसल्याचे म्हटले आहे. तर, माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणताहेत की, नामकरणास विरोध केला तर जशास तसे उत्तर देऊ. संजय राऊतांची वक्तव्ये हास्यास्पद आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पालिकेने कोणताही ठराव करून पाठवला नव्हता. नामकरणाबाबत कॅबिनेटने निर्णय घ्यावा, असे दरेकर म्हणाले.
मुळीक म्हणाले, भामा आसखेड योजनापूर्तीवरून श्रेयवाद आणि बॅनरबाजी सुरू आहे. या योजनेसाठी ८० टक्के निधी भाजपा सरकारने दिला होता. महाविकास आघाडी सरकारने एकही रुपया दिलेला नाही. त्यांचे शून्य टक्के योगदान आहे; तरीदेखील श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी सुरु आहे. महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करताना राजकीय हेतू समोर ठेवला गेलाय. जिल्हा परिषदेत २३ गावांचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीकडे आहे. पण या गावांचा विकास करू न शकल्यानेच समावेशाचा घाट घालण्यात आला आहे. समावेशाचा राजकीय फायदा होण्यापेक्षा राष्ट्रवादीचा भ्रमनिरास होणार असल्याचे मुळीक म्हणाले.
===
अराजक निर्माण करण्याचा सेनेचा प्रयत्न
शिवसेनेकडून ईडीच्या कारवाईबाबतीत रस्त्यावर आंदोलन करू, असे व्यवस्थेला आव्हान दिले जात आहे. केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयालाही सेनेचे नेते मानत नाहीत. केवळ अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.
===
सरकारच्या केवळ धमक्या आणि भूलथापा
ईडी लावली तर सीडी लावतो, असे म्हणणारे एकनाथ खडसे सीडी शोधत असावेत. या सरकारच्या केवळ धमक्या आणि भूलथापा सुरू आहेत. मूलभूत प्रश्नांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिवृष्टी, निसर्ग वादळ, कायदा सुव्यवस्था, मराठा आरक्षण याकरिता कोणीही रस्त्यावर येत नाही, असा आरोप दरेकर यांनी केला.