पुणे : आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांनी मत मांडावं, असा त्यांचा (सरकारचा) आग्रह आहे. राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा, ही भूमिका समंजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना फटकारले.
सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला, असा आरोपही त्यांनी केला. पुणे येथील एका कार्यक्रमानंतर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली हाेती. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, अलीकडील भुजबळांची दोन भाषणं छान झाली. त्याआधी ते बीडला गेले. बारामतीतही त्यांनी चांगलं भाषण केलं. दोन्ही भाषणांत माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं. त्यानंतर ते मला भेटायला आले. भुजबळ मला म्हणाले, ‘झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील.’ पण, स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे.
जरांगेंना काय कमिटमेंट केली ते सांगा
या सर्व गोष्टीत सरकारतर्फे चर्चेला मुख्यमंत्री शिंदे होते. छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, अजित पवार होते. इतरही हाेते. या लोकांनी काय निर्णय घेतला माहीत नव्हते. आम्हाला बाजूला ठेवून यांनी निर्णय घेतले. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे, असं ‘मार्गदर्शन’ भुजबळांनी केलं, असेही पवार म्हणाले. मी सांगितलं की, प्रश्न सोडवायचा असेल तर जरांगेंना काय कमिटमेंट केली आहे, कोणत्या गोष्टीची पूर्तता केली व करणार आहात, ते सांगा. ओबीसींना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली असेल तर तीही माहिती द्या. त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमची धोरणं दुरुस्त करून, बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ, असंही पवार यांनी म्हणाले.
महिन्याने जागे झाले
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आषाढीनिमित्तच्या पोस्टबद्दल पवार म्हणाले, राज ठाकरे ८-१० दिवसांनी, महिन्याने, दोन महिन्यांनी कधी जागे झाले तर असं बोलतात. ते अशाच विषयावर टिप्पणी करतात, ज्याची दखल वाचक घेतात, ज्यामुळे उद्याच्या पेपरात बातमी होईल, असे म्हणत पवारांनी फिरकी घेतली.