पिंपरी : रिमोट कंट्रोलद्वारे वीजपुरवठा नियंत्रित करून गेल्या १५ वर्षांपासून वीजचोरी करण्याचा प्रकार एमआयडीसी, भोसरीतील कंपनीने केला आहे. तब्बल १५ लाख ६८ हजार ६०० रुपयांची ही चोरी आहे. या प्रकरणी ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट आणि लक्ष्मी हिट ट्रीटर या कंपनीच्या भागीदार व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. रिमोटद्वारे वीजचोरी करण्याची ही पुण्यातील चौथी आणि शहरातील पहिली घटना आहे. या प्रकरणी ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंटचे अमरजीतसिंग अरोरा, वीज वापरकर्ता लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीचे भागीदार कमलाकर चिंतामण गोगटे, दत्तात्रय रघुनाथ इनामदार, पूजा प्रदीप नागवेकर, सोमनाथ रामदास यादव, अंगित सुरेंद्रन नायर या सहा जणांविरुद्ध रास्ता पेठ येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३नुसार कलम १३५, १३८अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भोसरी विभागांतर्गत असलेल्या एमआयडीसी एफ टू ब्लॉक, प्लॉट क्रमांक १७/३, येथे ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीला औद्योगिक वीजजोडणी आहे. या कंपनीच्या जागेत लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीचा वीजवापर सुरू आहे. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपनीतील वीज वापराबाबत केलेल्या विश्लेषणात संशय निर्माण झाला. त्यामुळे कंपनीतील वीज मीटर यंत्रणेची पाहणी केली. रेझीन कास्ट मोल्डेस सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) ही यंत्रणा वीजचोरीच्या हेतूने हाताळल्याचे दिसून आले. अधिक तपासणीसाठी ही सीटी फोडण्यात आली. त्या वीजचोरीसाठी हेतुपरस्पर फेरफार करून रिमोट कंट्रोलचे सर्किट समाविष्ट केल्याचे आढळून आले. या सर्किटच्या साहाय्याने वीजप्रवाह सुरू असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत होती. गेल्या १५ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. एकूण १ लाख १९ हजार ८५३ युनिटची म्हणजे १५ लाख ६८,६०० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. रिमोटद्वारे वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी कार्यकारी अभियंता धर्मराज पेठकर, प्रवीण नाईक, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र कंदाळकर, उपकार्यकारी अभियंता एस. एस. हातोळकर, सहायक अभियंता रमेश सुळ, शीतल बोथे, तंत्रज्ञ कृष्णा गायकवाड, विष्णू भुजबळ आदींनी योगदान दिले.(प्रतिनिधी)गेल्या १५ महिन्यांपासून रिमोट कंट्रोलद्वारे वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले. वीज कर्मचारी तपासणीस जात, त्या वेळी रिमोटद्वारे मीटर सुरू केला जात होता. कर्मचारी बाहेर पडताच थेट वीज वापरली जात होती. तपासणीत बिलाबाबत संशय आल्याने तपासणी केली गेली. त्यात हा प्रकार आढळला. कंपनीने सर्व बिल भरले आहे.- धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग
रिमोट कंट्रोलद्वारे वीजमीटरवर नियंत्रण
By admin | Published: December 01, 2015 3:38 AM