जेजुरी : गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकाºयांविना जेजुरी नगरपालिकेचा कारभार चालला असून शहरातील नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांनीच आज नगरपालिकेला टाळे ठोकले.मागील आठवड्यात टाळे ठोको आंदोलनाचा इशारा सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, पालकमंत्री, जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदनाद्वारे दिला होता. आज (दि. १५) सकाळी अकरा वाजता उपाध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक अजिंक्य देशमुख, गणेश शिंदे, सुरेश सातभाई, महेश दरेकर, योगेश जगताप, नगरसेविका रुक्मिणी जगताप, पौर्णिमा राऊत, वृषाली कुंभार, शीतल बयास यांनी पालिका कार्यालयाला अखेर टाळे ठोकले. या वेळी माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, रमेश बयास, सुशील राऊत, भगवान राऊत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी (दि. १८) पालिका उघडली जाईल, तत्काळ पूर्णवेळ मुख्याधिकाºयांची नियुक्ती झाली तर ठिक अन्यथा पुढील कालावधीत कार्यालय बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असे उपस्थित नगरसेविका व नगरसेवकांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सत्ताधाºयांनी पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा, अशी वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर पालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काँग्रेसचे गटनेते सचिन सोनवणे यांनी सांगितले.चार महिन्यांपासून अनागोंदी : अनेक पदे रिक्तजेजुरी नगरपालिकेत गेल्या चार महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नाहीत, लोकनियुक्त नगराध्यक्षा यांना जात पडताळणी समितीने अपात्र ठरविल्याने हे पदही रिक्त आहे, तर बांधकाम अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने प्रशासनाकडून या पदावर दुसरा अधिकारी नियुक्त केला नाही, त्यामुळे पालिकेतील विकासकामांचे प्रस्ताव प्रलंबित असून अनेक विकासकामे व नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, सर्वसामान्यांना साध्या-सुध्या दाखल्यांसाठी सासवड नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकाºयांची प्रतीक्षा करावी लागते. नगरपालिकेत कर्मचाºयांची १४ पदे रिक्त आहेत.येथील तात्पुरता पदभार सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे सर्वसाधारण दाखले मिळवताना सासवड येथे दप्तर घेऊन जावे लागते किंवा मुख्याधिकारी कधी येणार, याची वाट पाहावी लागते. गेल्या चार महिन्यांपासून शहरातील विविध विकासकामेही ठप्प आहेत.- गणेश निकुडे (उपनगराध्यक्ष, जेजुरी नगरपालिका)
जेजुरी नगरपालिकेला सत्ताधा-यांनीच ठोकले टाळे, कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 2:22 AM