राजगुरुनगर: येथील नरगपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे तीन कोटी ८५ लाख रुपये थकीत वीज बिल न भरल्याने गुरुवारी महावितरणने या योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा बंद झाला असून नागरिकांचे हाल सुरु झाले आहे. दरम्यान, याप्रकारामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपला असून लवकरच निवडणूक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या नगर परिषेदेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नगरपरिषदेचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. त्यामध्ये १७ कोटी शिल्लक दाखवण्यात आली, असे असताना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे तब्ब्ल पावणेचार कोटी रुपयांची वीजबिल थकित राहिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही थकीत २०१८ पासून आहे. त्यावेळी प्रशासकाची नेमणूक नव्हती त्यामुळे २०१८ पासून ते प्रशासक नेमण्याच्या कालावधीपर्यंत थकीत बिल का भरण्यात आले नाही असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जाऊ लागल आहे. दुसरीकडे शहरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी कडून प्रादेशी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. टेस्टिंग होत आहे मात्र नागरिकांना पाणी अद्याप सुरू नाही. त्याचे कोटी रुपयांचे बिल मात्र भरण्यात आले आहे. याबद्दल नागरिकांनी कार्यालयात विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर किमान ३३ टक्के बिल भरणा करण्याची कंपनीची अट आहे. नगरपरिषद प्रशासनाने सायंकाळी तातडीने ३५ लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला. उर्वरित बिलाबाबत सोमवारी (दि १५) वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील असे सांगण्यात येत आहे..यामुळे दोन दिवस पाणी पुरवठा सुरळीत ठेवला जाईल.मात्र ही टांगती तलवार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.खुर्चीवर बसलेले नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व सर्वच नगरसेवक काय करीत होते. असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
राजगुरूनगर नगरपरिषद सन २०१८ पासूनचे थकीत विज बिल आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून विज वितरण कंपनीने वरिष्ठ स्तराहेवरून ही कारवाई केली.
अविनाश सांवत
सहायक अभियंता,वीज वितरण कंपनी, राजगुरूनगर