पुणे : महारष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य पूर्वपरीक्षा येत्या रविवारी (दि.२१) होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर एमपीएससीने जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोविड १९ सदृश लक्षणे आढळून येत असतील त्यांना पीपीई किट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले.
एमपीएससीने परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे. ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. अशा विद्यार्थ्यांना मुखपट, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप आदी बाबी समाविष्ट असलेलं किट दिले जाणार आहे. तसेच स्वतंत्र बैठक व्यवस्था करणे सोपे जाणार आहे. तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी परिपत्रक जाहीर केले आहे. उमेदवारांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिले जाणार आहेत. असे असले तरी दिलेल्या सूचनांचे पालन विद्यार्थ्यांना करावेच लागणार आहे. परीक्षा केंद्रात येताना उमेदवाराने तीन पदरी कापडाचे मास्क किंवा मुखपट्टी बांधणे आवश्यक आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेऊन सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. स्वतःचा जेवणाचा डबा घेऊन यावा. पाण्याची बाटली सोबत ठेवावी. राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर असल्याने उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर पडता येणार नाही. तसेच उमेदवाराने एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई केली आहे. सुरक्षित अंतर पाळून सूचनांचे पालन करावे. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर जाताना फिजिकल डिस्टन्स पाळावे. वापरलेले टिश्यू पेपर, मुखपट, हातमोजे आदी वस्तू कचरा कुंडीत टाकावेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. यावरून परीक्षा किती गंभीरपणे घेतली जात आहे. हे दिसून येते. त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती नाही.
- सचिन लेंढवे, परीक्षार्थी
एमपीएससीने सहा महिन्यांपूर्वीच काळजी घेणार असल्याचे जाहीर केले होते. केवळ सरकारला स्वतःवर विश्वास नव्हता की काय असे वाटते आहे. यापेक्षा अजून काळजी कशी घेणार. एमपीएससीची सर्व तयारी असताना केवळ राजकारणापोटी परीक्षा पुढे ढकलली जात होती.
- अनिल कदम, परीक्षार्थी
चौकट
विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास
मोठा संघर्ष करून ही परीक्षा होत आहे, याचा आनंद आहे. एकदाची परीक्षा पार पडणार आहे. कोरोनाची मोठी भीती मनामध्ये होती. आता, मात्र ती दूर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोरोनासदृश लक्षणे आहेत. त्याच्यापुढे खूप मोठा प्रश्न होता, की परीक्षा देता येईल की नाही. मात्र, पीपीई किट मिळणार असल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडल्याचे मत विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.