पुणे: पुण्यभूषण फाऊंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ स्वरयोगिनी डॉ.प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. भारतीय अभिजात संगीत विश्वातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविली आहे.ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे ठरविले आहे. पुरस्काराची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच हा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान, पं. जसराज,ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांसारख्या सांगीतिक क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्काराचे यंदाचे ३० वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्य सैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये रघुनाथ गंगाराम लकेश्री, बलबीर सिंग, संदीप बाजीराव उकिरडे, विनीता अशोक कामटे (कै.अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दीनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांचा समावेश आहे. भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात किराणा घराण्याच्या गायिका म्हणून डॉ. प्रभा अत्रे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा नावलौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा,गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे काम त्यांनी केले. प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली,रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली.तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायकीची ओळख करून दिली. प्रभाताईंनी शास्त्रीय संगीतावर मराठी, इंग्रजी भाषांमध्ये पुस्तके लिहिली. ’स्वरमयी’,‘स्वरांगिणी’आणि ’स्वररंजनी’ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.
प्रभा अत्रे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 7:02 PM
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा नावलौकिक आहे. या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्य सैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देभारतीय अभिजात संगीत क्षेत्रात म्हणून डॉ. प्रभा अत्रे किराणा घराण्याच्या गायिका म्हणून नावलौकिक पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली,रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचना