पुणे : ख्यातकीर्त गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी अपमान झाल्याच्या कारणास्तव ‘स्वरभास्कर’ पुरस्कार नाकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुरस्कार वितरण समारंभाला झालेल्या विलंबाचा ठपका विनाकारण माझ्यावर ठेवत, मला बदनाम करण्याचा झालेला प्रयत्न हा आपल्याच गावात, आपल्याच माणसांकडूनच झालेला अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. परिणामी महापौर आणि डॉ. अत्रे यांच्यातील वादाचा तारस्वर टीपेला पोहोचला आहे.महापालिकेकडून डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर केलेल्या स्वरभास्कर पुरस्काराचे वितरण करण्यास स्वत: अत्रे यांनी घातलेल्या काही अटींमुळेच विलंब होत असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. या वक्तव्यामुळे डॉ. अत्रे दुखावल्या गेल्या. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्याविषयी नितांत आदर आहे. पण समारंभाच्या मुद्याला सार्वजनिक स्वरूप दिल्यामुळे नाइलाजास्तव हा पुरस्कार स्वीकारणार नाही, असे पत्र त्यांनी महापौरांना पाठविले आहे. गेल्या ८३ वर्षांच्या काळात एक ‘पुणेकर’ असूनही महापालिकेने कोणताच सन्मानकिंवा कौतुक केले नाहीच ! उलट कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘स्वरभास्कर’ पुरस्कार मला जाहीर करूनही, या पुरस्कार वितरण समारंभाला विलंब झाल्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आला. महापौरांनी दिलेली माहिती चुकीची, दिशाभूल करणारी तसेच नाहक बदनामी करणारी असल्याचे सांगत हा पुरस्कार आपण नाकारत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पत्रामध्येही त्यांनी याच गोष्टींचा पुनरुच्चार केला आहे.यासंदर्भातील संपूर्ण खासगी ई-मेल, पत्रव्यवहार सार्वजनिक करण्यात आला, याबाबत संताप व्यक्त करीत पालिकेकडून झालेला हा व्यवहार केवळ अपरिपक्व, बेजबाबदारच नाहीतर अनैतिकही आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. आयोजनात अडचणी येत असतील तर पुरस्कार घरी आणून दिला तरी चालेल, असेही सांगितल्याचे त्या म्हणाल्या.ठराविक व्यक्तिच्याच हस्ते पुरस्काराचे वितरण केले जावे, असा डॉ. प्रभा अत्रे यांचा आग्रह होता. महापालिकेने त्यादृष्टीने प्रयत्न देखील केला होता. डॉ. अत्रे या मोठ्या गायिका आहेत. त्यामुळे त्यांना पुरस्कार द्यायला महापालिकेला आवडेलच, हा पुरस्कार त्यांनी घ्यावा, यासाठी पालिकेकडून त्यांना विनंती करण्यात येईल, असे स्पष्टीकरण महापौर धनकवडे यांनी दिले.पालिकेचा ढिसाळ कारभार तसेच पुरस्कार वितरण समारंभ आणि पुरस्कारार्थी या दोघांची प्रतिष्ठा लक्षात न घेता समारंभ उरकून टाकण्याची मानसिकता यामुळेच कार्यक्रमाला विलंब झाला, असा ठपका डॉ. प्रभा अत्रे यांनी महापालिकेवर ठेवला.
प्रभा अत्रे यांनी नाकारला ‘स्वरभास्कर’ पुरस्कार
By admin | Published: May 30, 2015 2:05 AM