पुणे : १२ ते १३ हजार चित्रपटांची मेजवानी आजवर पुणेकरांना देणाऱ्या प्रभातचा अस्त होणार असल्याची बातमी समजल्यानंतर चित्रपटरसिक हळहळले. मात्र, या चित्रपटगृहाचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी अनेक घटक पुढे आल्याने डिसेंबरअखेर चित्रपटगृहाची वास्तू कायम राहणार की नव्या वर्षात अस्तित्वाची ‘प्रभात’ पुन्हा उजाडणार, याविषयी रसिकांच्या मनात हुरहुर आहे.१९८५ नंतर निव्वळ मराठी चित्रपटांसाठीच प्रभात उपलब्ध आहे. इंदूरचे सरदार किबे यांच्या मालकीच्या १४ हजार चौरस फूट क्षेत्रापैकी प्रत्यक्ष चित्रपटगृह असलेल्या जागेमुळे प्रभातच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. १९७० पर्यंत दर दहा वर्षांनी भाडेकराराने नूतनीकरण होत होते. १९७० मध्ये ३० वर्षांचा भाडेकरार झाला. तो डिसेंबरमध्ये संपत आहे. चित्रपटगृहात २५ कर्मचारी असून, व्यवस्थापक बाळकृष्ण भिडे आज ८२ वर्षांचे आहेत. १९७१ पासून ते व्यवस्थापकाचे काम पाहतात. त्यांच्यासह अनेक कर्मचारी जुने असून, त्या सर्वांमध्ये अस्वस्थता आहे.गेल्या ८० वर्षांत १३ हजारावर चित्रपटांची मेजवानी दिली. ५१ चित्रपटांनी येथे सुवर्णमहोत्सव साजरा केला. ४६ चित्रपट १०० दिवस चालले. ११७ चित्रपटांनी ५० दिवस रसिकांना येथे आमंत्रण दिले. ‘तोहफा’ हा १९८५ मधील अखेरचा हिंंदी चित्रपटही २६ आठवडे चालला. त्यानंतर मराठी चित्रपटांसाठी प्रभात हक्काचे माहेरघर आहे.अमिताभ तसेच जया बच्चन, लता मंगेशकर अशा कलावंतांनी या चित्रपटगृहाला भेट दिली आहे. मराठीत बहुतेक कलावंतांनी हजेरी लावली आहे. मल्टिीफ्लेक्स संस्कृतीमुळे प्रभातमध्ये चित्रपटाचा प्रिमीयर होऊ शकला नाही. किबे यांच्या तिसऱ्या पिढीच्या निर्णयावर पुण्याच्या या सांस्कृतिक ठेव्याचे अस्तित्व अवलंबून आहे.(प्रतिनिधी)
प्रभातची ८० वर्षांत १२ हजार चित्रपटांची मेजवानी
By admin | Published: December 04, 2014 4:53 AM