पुणे: ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त दि. २० ते २६ जानेवारी दरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात '' प्रबोधन महोत्सव'' आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात व्याख्याने, राजकीय क्षेत्रातील महिलांच्या तसेच युवा नेत्यांच्या मुलाखती, प्रबोधनकार लिखित आणि संपादित साहित्याचे अभिवाचन तसेच छायाचित्र-व्यंगचित्रांचे प्रदर्शन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
या प्रबोधन महोत्सवाचे उद्घाटन दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना नेते, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शिक्षणमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब दराडे, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेना उपनेत्या, डॉ. नीलम गोऱ्हे व संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी पत्रकार परिषेदत दिली.
बालगंधर्व कलादालनात प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख यांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे, प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
......