लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “नव्या शिक्षण पद्धतीमधे कौशल्यपूर्ण व संशोधनात्मक अभ्यासाबरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थांनी संशोधनावर लक्ष केंद्रित करत असताना भविष्यात व्यवसाय व व्यवहार फायदेशीर ठरेल अशा संशोधनावर भर देणे गरजेचे आहे,” असे मत प्रसिध्द संगणकतज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप महाविद्यालय, पूना कॉलेज आणि गोवा येथील श्री दामोदर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाबूरावजी घोलप स्मृती सप्ताहाच्या निमित्त ‘नवीन शिक्षण पद्धती आणि माहिती तंत्रज्ञान’ यावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘पुणे विद्यापीठा’च्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. अन्वर शेख, प्राचार्य डॉ. प्रिता मल्या आदी यावेळी उपस्थित होते.
शिकारपूर यांनी नव्या शिक्षण पद्धतीत उच्च शिक्षणाचा हेतू, उच्च शिक्षणासमोरची आव्हाने, अभ्यासक्रमाची वस्तुस्थिती, बेरोजगारीची चिंता याबाबत माहिती दिली. डॉ. अन्वर शेख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आभार मानले. प्रा. सुवर्णा खोडदे यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र व गोव्यातील बाराशेपेक्षा जास्त शिक्षक, विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.