पाईट : भामा आसखेड धरणामधून दौंड तालुक्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावरून प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी धरणावर धरणग्रस्तांनी जमून पाणी सोडण्याचा निषेध केला. या वेळी जमावबंदी आदेश असल्याने धरणग्रस्तांनी इशारा देत येत्या दोन दिवसांमध्ये तातडीने तोडगा काढला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून सध्या भामा आसखेडमधून ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सोडण्यामुळे प्रकल्पबाधित गावांमधील शेतीला, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या ठिकाणी तालुक्यातील शेतीचा कोणताही विचार न करता पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भामा आसखेडचे सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी धरणग्रस्तांची बाजू ऐकून घेतली. येत्या दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्याबाबतची भूमिका भामा आसखेड धरणावर येऊन जाहीर केली नाही, तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी महादेव लिंभोरे, कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे, चांगदेव शिवेकर, दत्ता रौंधळ, दत्ता होल, रामदास खेंगले, धोंडिभाऊ कुडेकर, शंकर खेंगले, संभाजी कोळेकर, नवनाथ दरेकर, तुकाराम लिंभोरे, काशिनाथ लिंभोरे, किसन नवले, शुकराज लिंभोरे, संजय कोळेकर, भगुजी नवले, नितीन रायकर आदी शेतकरी जमा झाले होते.
पाणी सोडल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक
By admin | Published: March 30, 2016 2:07 AM