कळस : रुई (ता़ इंदापूर) येथील बाबीरबुवा देवस्थानची यात्रा यंदा वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. शेकडो वर्षापासून नवस फेडण्यासाठी असलेली परंपरा या वर्षी प्रथमच खंडीत करण्यात आली आहे . बालकांच्या पायाला बांधून शेंदण्याची प्रथा शेकडो वर्षापासून सुरु होती़ त्याऐवजी आता बालकांना पाळण्यात बसवून झोका देण्याची प्रथा यंदापासून सुरु करण्यात आली़ यात्रेत आलेल्या लाखो भाविकांमध्ये नवस फेडण्याच्या पध्दतीमध्ये झालेला बदल चर्चेचा विषय ठरला. बालकांच्या सुरक्षिततेसाठी झालेला हा बदल महत्वपूर्ण मानला जात आहे. मागील वर्षी या प्रथेच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवला. त्यामुळे व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. बाबीर देवस्थान नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांमध्ये श्रद्धा आहे. विशेषत मुल होण्यासाठी या देवस्थानला नवस करण्याची प्रथा आहे. त्यासाठी जन्माला येणाऱ्या बालकाला देवस्थानच्या पायरीवरुन पायाला पागोटे बांधुन घागरीप्रमाणे शेंदण्याची प्रथा होती. अनेक वर्षापासून ही प्रथा होती. मात्र, मागील वर्षापासून या प्रथे विरोधात तक्रारी झाल्या. श्रद्धेच्या नावाखाली बालकांचे जीव धोक्यात घातले जात आहे, अशी तक्रार होती. ‘लोकमत’ सह सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी या प्रथेच्या विरोधात आवाज उठवला. पोलिसांनी त्याची दखल घेऊन या पद्धतीने नवस फेडणाऱ्या तीन भाविकांवर गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यामुळे यंदा भाविकांनी देखील धास्ती घेतली होती. त्यामुळेच विश्वस्तांनी या प्रथेला बगल देऊन पर्याय शोधला. मुलांच्या पायाला फेटा बांधून शेंदण्याऐवजी पाळण्यात बसवून झोका देण्याची नवी प्रथा सुरू केली. सुमारे २० ते २५ फुट उंचीवरुन बालकाला खाली सोडण्यात येत होते. अंधश्रध्दा निर्मुलन समिती ने गतवर्षी नवस फेडण्याच्या या प्रथेविरोधात आवाज उठविला. या पार्श्वभूमीवर यंदा नवस फेडण्याच्या बगाड प्रथेला फाटा देण्यात आला. तर यामध्ये बालकाला पायाला पागोटे बांधुन खाली सोडुन शेंदण्याची पूर्ण बंद करण्यात आली. याऐवजी नवस फेडण्याची सर्वमान्य पध्दत अमलात आणण्यात आली. या पध्दतीमध्ये बालकाला बगाड देण्याऐवजी पाळण्यात बसवुन झोका देण्यास सुरवात केली आहे. बगाड प्रथा बंद केल्याचे फलक देवस्थानेने या ठिकाणी लावले आहेत. त्यानुसार सुधारीत पध्दतीने भक्तांनी यंदा च्या यात्रोत्सवापासुन सुरवात केल्याचे चित्र आहे़ त्यामुळे ही यात्रा एैतिहासिक ठरली आहे.
बाबीर देवस्थानच्या यात्रेतील बगाडाची प्रथा बंद
By admin | Published: November 15, 2015 12:52 AM