लोकमत न्यूज नेटवर्कमहापालिकेकडून स्वस्तात मिळणाऱ्या पाण्याने टँकर भरून घ्यायचा व तो महागड्या दराने महापालिकेच्या हद्दीबाहेर विविध प्रकारच्या व्यावसायिकांना विकायचा, असा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहे. महापालिकेला या व्यवहारातून अधिकृतपणे ३ कोटी रुपये वर्षाला मिळतात. टँकर लॉबी मात्र यातून कित्येक कोटी रुपये कमवत आहे. या वर्षी पाणीसाठा चांगला असल्याने या व्यवहाराला चांगलीच बरकत आल्याची चर्चा टँकर लॉबीत आहे. महापालिकेच्या हद्दीतच पाणी वितरित करण्याचे बंधन असतानाही सर्रास टँकरद्वारे पाणी हद्दीबाहेर नेऊन विकले जात आहे. महापालिकेच्या टँकर पाँइंटवरून टँकर भरून गेल्यानंतर पुढे त्याची तपासणी करणारी कसलीच यंत्रणात महापालिकेकडे नाही. अशी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न टँकर लॉबीने हाणून पाडला आहे. त्यासाठी राजकीय दबावाचाही वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत ही टँकर लॉबी चांगलीच शक्तिशाली झाली असून, तिच्याकडून पाणीपुरवठा विभागाला टँकरसाठी वेठीस धरले जात आहे. प्रशासनाने टँकर भरून द्यायचे बंद केले, की लगेचच राजकीय दबाव आणून टँकर भरून द्यायला करण्यास भाग पाडले जाते.टँकरचालकांनी महापालिकेत पैसे जमा केले, की त्यांना एक कूपन दिले जाते. ते त्यांनी महापालिकेच्या त्यांच्या नजीक असलेल्या टँकर पॉँइंटवर दाखविले, की त्यांना टँकर भरून मिळतो. हे पाणी महापालिकेने शुद्धीकरण प्रक्रिया केलेले पाणी, प्यायचे पाणी असते. महापालिकेच्या हद्दीतच टँकरचालकांनी ते विकणे बंधनकारक आहे; मात्र तसे केले जात नाही. यातील अनेक टँकर सरळ बाहेर नेले जातात व पाण्याची गरज असलेल्या कंपन्या, बांधकाम व्यावसायिकांना पाणी विकले जाते. स्वस्तात मिळालेले पाणी विकताना मात्र बराच जास्त दर घेऊन विकले जाते. पाणी शुद्ध केलेले असल्यामुळे विकत घेणाऱ्यांना ते तरीही परवडते.यंदा पाणीटंचाई नाही. पुण्याच्या बहुतेक भागांमध्ये, उपनगरांमध्येही व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तरीही सध्या सुमारे १०० टँकर सुरू आहेत. बहुतेक टँकरमालक महापालिका हद्दीबाहेरचेच आहेत. टँकर बंद करण्याचा विचारही प्रशासन करायला तयार नाही, तसेच इतके टँकर भरून जातात तरी कुठे, याचाही विचार केला जात नाही. काही वर्षांपूर्वी टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्याचा विचार प्रशासनाने केला. तो प्रत्यक्षात येण्याआधीच टँकर लॉबीने हाणून पाडला. पदाधिकाऱ्यांनीही याची गरज नाही; म्हणून प्रशासनाला पाठिंबा देण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे पाण्याचा हा धंदा व्यवस्थित सुरू आहे. उपनगरांमधील अनेक नगरसेवकांकडून त्यांच्या भागात टँकर सुरू करण्याबाबत सांगितले जाते त्यामागेही हेच कारण असल्याची चर्चा आहे.
महापालिकेच्या पाण्याचा टँकरमधून गैरव्यवहार
By admin | Published: May 10, 2017 4:27 AM