प्रदीप कुरूलकरवर देशद्रोहाचा आरोप ठेवावा, काँग्रेसची मागणी; ATS कार्यालयासमोर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:35 AM2023-07-04T11:35:31+5:302023-07-04T11:36:27+5:30

पक्षाच्या वतीने नंतर एटीएस कार्यालयात निवेदन देण्यात आले...

Pradeep Kurulkar should be charged with sedition, Congress demands; Demonstration in front of ATS office | प्रदीप कुरूलकरवर देशद्रोहाचा आरोप ठेवावा, काँग्रेसची मागणी; ATS कार्यालयासमोर निदर्शने

प्रदीप कुरूलकरवर देशद्रोहाचा आरोप ठेवावा, काँग्रेसची मागणी; ATS कार्यालयासमोर निदर्शने

googlenewsNext

पुणे :डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)मधील शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरूलकर याच्यावर केवळ हेरगिरीचे आरोपपत्र ठेवले आहे. मात्र, हनी ट्रॅपमध्ये सापडलेल्या कुरूलकरवर देशद्रोहाचा गुन्हा ठेवून तसे आरोपपत्र न्यायालयात सादर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली. दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) शिवाजीनगरमधील कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. कुरूलकरची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप करण्यात आला.

आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, पूजा आनंद यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. कुरूलकर याला एटीएसने देशाची गुपिते पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपावरून अटक केली असून, सध्या त्याचा तपास सुरू आहे. डीआरडीओ संस्था पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली आहे. कुरूलकर याची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. त्यामुळेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

पक्षाच्या वतीने नंतर एटीएस कार्यालयात निवेदन देण्यात आले. पर्यावरणवादी, मानवी हक्कासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते अशा निरपराध शेकडोंवर केंद्र सरकारने देशद्रोहाचे गुन्हे नोंदवले. कुरूलकर याच्याविरोधात मात्र पुरावे असूनही केवळ हेरगिरीचा आरोप ठेवला आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता १२४ ‘अ’च्या अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही तर काँग्रेसकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.

Web Title: Pradeep Kurulkar should be charged with sedition, Congress demands; Demonstration in front of ATS office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.