पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हा ई मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी अधिक तपासासाठी १५ मेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसने डॉ. प्रदीप कुरुलकर याला अटक केली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एटीएसच्या वतीने सांगण्यात आले की, आरोपीकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचा फॉरेन्सिक अहवाल मंगळवारी दुपारी मिळाला. त्या अहवालाच्या अनुषंगाने सखोल तपास करायचा आहे.
कुरुलकर हा डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना भेटत होता. आरोपीकडे दोन पासपाेर्ट असून आरोपीने शासकीय पासपोर्ट वापरून ५ ते ६ देशांत दौरा केला आहे.
या दौऱ्यात कोणकोणत्या देशात व कशासाठी गेला आहे. कोणास भेटला आहे, याबाबात तपास करायचा आहे. आरोपीचे बँक स्टेटमेंट प्राप्त झाले असून, त्याला मागील काही दिवसात बाहेरच्या देशातून पैसे आले का, याचाही तपास करायचा असल्याने पोलिस कोठडीची मुदत वाढवून मिळाली, अशी विनंती एटीएसने केली. आरोपीच्यावतीने ॲड. हृषीकेश गानू यांनी युक्तिवाद केला.
मोबाइल नंबर ब्लॉक
आरोपीने अनेक मोबाइल नंबर नंतर ब्लॉक केले असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या मोबाइलवर नंबर का ब्लॉक केला असे मेसेज आल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोपीने मोबाइलवरून प्रत्यक्ष संभाषण, मेसेजद्वारे माहिती दिल्यानंतर ते नंबर ब्लॉक केले असावेत, असा एटीएसला संशय आहे.