पुणे : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री व लोकसभा अध्यक्षांनीही प्रज्ञासिंह यांची बाजू घेतली आहे. भाजपाकडून हा केवळ एका अधिकाऱ्याचा अपमान नसून महाराष्ट्र पोलिस दलाचा अपमान केला जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, अभय छाजेड व सचिव संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली. प्रज्ञासिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी व ठाण्याचे पोलिस आयुक्त परमविरसिंग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. प्रज्ञासिंह यांनी महाराष्ट्र पोलिसांविरूध्द तक्रार दिल्यास आपण कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते. आता मुख्यमंत्री परमविरसिंग यांना अटक करणार का? असा सवाल बालगुडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन प्रज्ञासिंह यांची पाठराखण करतात. महाराष्ट्र पोलिसांनी इंदौरमधील काही मुलांना अटक केली. पण त्यातील काही युवक परत आले नाहीत, असा आरोप महाजन यांनी केला आहे. या सर्व बाबी पोलिस दलाचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या आहेत, अशी टीका जोशी यांनी केली.
प्रज्ञासिंह यांच्या करकरेविषयीच्या वक्तव्यावर निवडणुक आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही. इतर वक्तव्यांबाबतच त्यांच्यावर ७२ तासांची बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्याकडून सातत्याने लोकशाही व्यवस्थेचा अपमान केला जात आहे, अशी टीका छाजेड यांनी केली.