पुणे: सध्या सोशल मीडियावर आपल्या अभिनयाने आणि इतर कलागुणांनी सर्वाधिक प्रसिध्दी मिळवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिने तीन वर्षांपूर्वी कवितांसंग्रह प्रकाशित केला होता. त्यामुळे तिच्याकडे कवयित्री म्हणून पाहिले जाते. आता तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार जाहीर झाला आहे.
माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून दोन वर्षांपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर (चंद्रपूर) आणि नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे अकरा आणि दहा हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे आहे. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, माजी आमदार अनंत गाडगीळ, परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ हा कवितासंग्रह तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. ग्रंथाली प्रकाशित ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या रसिकांसमोर आली. या झगमगत्या जगापलीकडेही कलावंतांना मन असते, भावना असतात. या भावनांना प्राजक्ताने काव्यस्वरूपात आपल्या समोर आणले आहे.