मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकरांना आघाडी करायची नव्हतीच : भालचंद्र मुणगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 05:00 PM2019-09-19T17:00:22+5:302019-09-19T17:08:31+5:30
काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची जरी ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकर यांना आघाडी करायची नव्हतीच असे मत काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
पुणे : काँग्रेसनेमुख्यमंत्रीपदाची जरी ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकर यांना आघाडी करायची नव्हतीच असे मत काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. आंबेडकर यांच्या मागण्यांचे शेपूट प्रत्येकवेळी अवास्तव होते अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पुण्यात काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, वंचितने काँग्रेससोबत यावे असे आम्हालाही वाटत होते पण त्यांना कधीही आघाडी करायची नव्हती. प्रत्येकवेळी त्यांची ताठर राहिलेली आहे. यावेळी त्यांनी सरकारावरही टीका केली. ते म्हणाले की, दलित हा शब्द न वापरता अनुसूचित हा शब्द वापरावा असे सरकारचे म्हणणे म्हणजे रिकामपणाचा उद्योग आहे. दलितांना दिले जाणारे आर्थिक,राजकीय,सामजिक कार्यक्रम बंद करून, मुस्कटदाबी करून शब्दखेळ करण्याचं काम सुरू आहे. दलित शब्दाला निर्माण झालेली धार कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
देशाच्या अर्थकारणाच्या सद्यस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, देशाचा आर्थिक विकास दर कमी होत चालला आहे. याला मोदी सरकारच्या काळात झालेले दोन चुकीचे निर्णय कारणीभूत आहेत..यामध्ये एक नोटाबंदी व दुसरा जीएसटी लागू करणे या दोन निर्णयाचा फटका बसला आहे. सध्या अनेक उद्योग बंद झाले. ऑटोमोबाईल कंपन्या बंद झाल्याने जवळपास साडेतीन लाख लोकांचा रोजगार गेला असून .भाजप सरकार मात्र सध्याची ही परिस्थिती मान्य करायला तयार नाही असेही ते म्हणाले.