पुणे : वंचितमधून अनेक लाेक साेडून चालले आहेत. एमआयएम साेबतची त्यांची युती तुटली आहे. अनेक कार्यकर्ते आता आरपीआयमध्ये येत आहेत. वंचितला फारशी मते मिळणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या राजकाराणामुळे वंचितांना सत्ता कधीही मिळणार नाही. सत्ता मिळवायची असेल तर माझ्याकडून शिका आणि वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवायचे असेल तर प्रकाश आंबेडकरांकडून शिका अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.
पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बाेलत हाेते. आठवले म्हणाले, निवडून येण्यासाठी मी अनेक प्रयाेग केले. वेगळी आघाडी करुन सत्ता मिळवणे अवघड आहे. वंचितचा एकमेव खासदार एमआयएमच्या तिकीटावर निवडून आला आहे. येत्या विधानसभेला वंचितला फारशा जागा मिळतील असे वाटत नाही.
आम्हाला निवडणुक आयाेगाने संगणक हे चिन्ह दिले आहे. संगणक चिन्ह मिळाल्याने ईव्हीएम मशीन चालवणे अवघड नाही. आम्ही ईव्हीएमचं हॅकींग करणार नाही. आम्ही बराेबरच बटण दाबणार. आरपीआय कमळावर निवडणूक लढवणार नाही. आम्ही 10 जागांची मागणी केली आहे. किमान आठ जागा तरी आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप झाल्यानंतर मित्र पक्षांच्या जागांचा विचार करण्यात येणार आहे. मित्रपक्षांमध्ये आमचा पक्ष माेठा असल्याने आम्ही जास्त जागांची मागणी करणार आहाेत. असेही आठवले यावेळी म्हणाले.
पवारांची चाैकशी हाेणे याेग्य नाहीराज्य सहकारी बॅंकेच्या घाेटाळ्यात शरद पवार यांचे नाव नाही असे आण्णा हजारे सुद्धा म्हणाले आहेत. पवारांची चाैकशी हाेणे याेग्य नाही. जे दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई हाेईल. पवार हे जाणते नेते आहेत. सुक्ष्म पद्धतीने ते काम करतात. त्यांची चाैकशी करणे याेग्य नाही. परंतु सूड बुद्धीने सरकारने चाैकशी लावली असल्याचे मला वाटत नाही. असेही आठवलेंनी यावेळी सांगितले.