पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या मदतीला आता साेशल मिडीयाची टीम सज्ज असणार आहे. पुराेगामी, आंबेडकरीवादी तरुणांसाेबत 2 फेब्रुवारी राेजी प्रकाश आंबेडकरांची पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी साेशल मिडीयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कशी पाेहाेचवता येईल याबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. महाराष्ट्रातील विविध भागांमधून या तरुणांना निमंत्रित करण्यात आले हाेते. वंचित बहुजन आघाडी बद्दल त्यांना काय वाटते हेही यावेळी जाणून घेण्यात आले.
सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. प्रकाश आंबेडकरांनी या आघाडीसाेबत एमआयएमला देखील साेबत घेतले आहे. आंबेडकर राज्यातील विविध भागांमध्ये सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना जाेरदार प्रतिसाद मिळत आहे. काेरेगाव- भीमाच्या घटनेनंतर आंबेडकर यांच्या मागे आंबेडकरी जनता उभी राहिली आहे. सध्या वंचित बहुजन आघाडी ही काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चिंतेचा विषय झाली आहे. वंचित बहुजन आघाडीची काॅंग्रेससाेबत जागावाटपाची चर्चा सुरु असली तरी त्यातून अद्याप ताेडगा निघालेला नाही. त्यातच आंबेडकरांनी राज्यातील सर्वच लाेकसभेच्या जागांवरुन उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान साेशल मिडीयावर देखील वंचित बहुजन आघाडी सक्रीय झाली आहे. आंबेडकरांनी राज्यभरातून शंभरहून अधिक तरुणांना चर्चेसाठी निमंत्रित केले हाेते. आंबेडकरी विचारांच्या या तरुणांना वंचित बहुजन आघाडीबाबत काय वाटते, साेशल मिडीयावर काय करायला हवे याबाबत चर्चा करण्यात आली, तसेच तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांचे देखील आंबेडकरांनी यावेळी निरसन केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची साेशल टीम सज्ज झाली आहे.