लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील नामांकित महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पुण्याच्या शैक्षणिक वैभवात भर घालणाऱ्या अभिनव आर्किटेक्चर महाविद्यालयाला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकत नाही, असे सांगत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविद्यालय वाचवण्याबाबत हात झटकले आहेत. त्यामुळे शिक्षण वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आर्किटेक्चर कौन्सिल आॅफ इंडियाच्या अध्यक्षांनी व उपाध्यक्षांनी अचानक टिळक रस्त्यावरील भारतीय कला प्रसारणी सभा संस्थेच्या कॉलेज आॅफ आर्किटेक्चरला (अभिनव आर्केटेक्चर) भेट दिली. तसेच अर्धा ते पाऊण तास महाविद्यालयाची तपासणी करून महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे प्रवेश चालू शैक्षणिक वर्षापासून बंद केले. मात्र, यंदा देशातील कोणत्याही आर्किटेक्चर महाविद्यालयाची तपासणी केली नाही. तसेच अभिनव आर्किटेक्चर सोडून सर्व महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यास मान्यता देण्यात आली, असा दावा महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्कर कानविंदे यांनी केला आहे.राज्यातील सर्व प्रमुख मंत्र्यांना तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना महाविद्यालयातील प्रवेश बंद होऊ नयेत, यासाठी निवेदन देण्यात आले होते. तसेच महाविद्यालयाचे प्रवेश बंद होऊ नयेत, अशी अपेक्षा महाविद्यालयाच्या आजी विद्यार्थ्यांनी व माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने व्यक्त केली होती. मात्र, कोणाकडूनही यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.हजारो विद्यार्थी बीकेपीएसच्या आर्किटेक्चर महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असते. मात्र, प्रवेश बंद झाल्याने विद्यार्थी निराश झाले आहेत. पुण्यात सर्व आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. अभिनव आर्किटेक्चर महाविद्यालय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मतदारसंघात येते. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री हेसुद्धा पुण्याचेच आहेत. तरीही पुण्यातील एकमेव अनुदानित आर्किटेक्चर महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. ही बाब विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासाठी लाजीरवाणी असल्याचे मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहर अध्यक्ष कल्पेश यादवर यांनी पुणे विभागीय तंत्र शिक्षण कार्यालयास बीकेपीएसच्या अर्किटेक्चर कॉलेजचे प्रवेश पुन्हा सुरू करावेत, असे निवेदन दिले आहे. तसेच प्रवेश सुरू न झाल्यास तीव्रआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक यांनी शासनाकडे महाविद्यालयाचे प्रवेश सुरू करण्याची शिफारस केली आहे.आर्किटेक्चर आता नगर विकास मंत्रालयांतर्गतप्रकाश जावडेकर यांच्याशी अभिनव आर्किटेक्चर महाविद्यालयाबाबत संवाद साधला असता ते म्हणाले, कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरच्या नियमावलीत हे महाविद्यालय बसत नसल्याने महाविद्यालयाचे प्रवेश थांबविण्यात आले आहेत. संस्थेच्या व महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी माझी भेट घेतली होती. कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर आता नगर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. त्यामुळे काहीही करू शकत नाही.
प्रकाश जावडेकरांनी झटकले हात
By admin | Published: July 16, 2017 3:52 AM