पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे (वय ७३) यांचे गुरूवारी (दि.२३) निधन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून ते ब्रेन ट्यूमरने आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना असा परिवार आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पायगुडे यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना आज उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. परंतु, त्यांचे एक एक अवयव निकामी होत गेले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रकाश पायगुडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी विविध नियतकालिकांत स्तंभलेखन केले आहे. ते ‘आमचा प्रतिनिधी’ या मासिकाचे संपादक आहेत. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संगीत महोत्सव, ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव यासारख्या अनेक कार्यक्रमांचे संयोजन केले आहे. त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत सूत्रसंचालन, निवेदन तसेच, आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी शंभराहून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. पायगुडे यांनी अशी पाखरे येती, गारंबीचा बापू, आग्र्याहून सुटका आणि बदाम राणी, चावट गुलाम या नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांची साहित्य वारी, घुमान द्वारी आणि रोटरी संघटना... इतिहास व कार्य ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.