पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी (बीएचआर) प्रकरणात प्रकाश वाणी, अनिल पगारिया यांच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.
बीएचआरच्या ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करुन पाच जणांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी प्रकाश वाणी आणि अनिल पगारिया यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करताना तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. प्रकाश वाणी हे अवसायक जितेंद्र कंडारे याचा कायदेशीर सल्लागार होता. तो कंडारे याच्या कार्यालयात असत. अनिल पगारिया हा एजंट म्हणून काम करतो. ठेवीदारांना तडजोड करण्याविषयी व जेवढे पैसे मिळत आहेत, ते घ्या असे सांगून सर्व १०० टक्के पैसे मिळाल्याचे शपथपत्र लिहून घेऊन त्यांना २५ ते ३० टक्के रक्कम दिली जात असे. त्यात एजंट म्हणून अनिल पगारिया याची भूमिका होती.
न्यायालयीन कोठडी असलेले विवेक ठाकरे, कमलाकरण काेळी आणि सुजित वाणी यांनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यांच्या जामीनावरही बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. महावीर जैन यानेही जामीनासाठी अर्ज केला असून त्याच्या अर्जावर १८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
आर्थिक गुन्हे शाखेत सध्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत जवळपास ४० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्यात त्यांनी प्रामुख्याने आपल्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे शपथपत्र घेऊन अगदी मामुली रक्कम दिल्याचे सांगितल्याचे समजते.