शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी- प्रल्हाद सिंह पटेल
By नितीन चौधरी | Published: November 12, 2022 04:52 PM2022-11-12T16:52:39+5:302022-11-12T16:54:05+5:30
मविआ सरकारने जलजीवन मिशनच्या कामाला सरकारने ब्रेक लावला; राज्यमंत्र्यांचे आरोप
- नितीन चौधरी
पुणे : महविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात राज्यातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले. जलजीवन मिशनच्या कामाला सरकारने ब्रेक लावला. त्यामुळे आघाडी सरकारच्या शिल्पकार असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय अन्न प्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली
दोन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर ते शनिवारी (त. १२) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मविआ सरकारकाळात चांगले काम नाही-
प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले, ''देशात २०१९ मध्ये जलजीवन मिशनला सुरुवात झाली. महाराष्ट्रापेक्षा कमी काम असलेल्या तेलंगणा, हरियाणा आणि गोवा राज्याने महाराष्ट्रापेक्षा चांगले काम करून जल जीवनमध्ये आघाडी घेतली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगले काम झालेले नाही. केंद्राने कोणताही भेदभाव करता सर्व राज्यांना जल जीवन मिशनसाठी निधी दिला. योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, त्यामुळे निधी देऊनही कामाला गती या सरकारने दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यास तत्कालीन सरकार जबाबदार असल्याने त्यावेळच्या नेत्यांनी जनेतची माफी मागावी. दरम्यान, २०२४ मध्ये पुन्हा भाजप बहुमताने सत्तेवर येईल आणि त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पवारांनी कोणती सहकारी संस्था उभी केली नाही
पटेल यांनी दोन दिवसांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. 'मात्र, मला विकास दिसला नाही तर नागरिकांमध्ये भीती दिसली,' असा आरोपही पटेल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''राजकारणातील त्यांची उंची बघता मी त्यांना साहेबच म्हणेल, परंतु त्यांनी एकही सहकारी संस्था उभी केल्याचे माझ्या माहितीत नाही.'' जगातील अन्य देशांचे तुलनेत भारतात इंधन स्वस्त आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.