राजेगाव : मलठण (ता. दौंड) येथील समृद्ध जीवन प्रकल्पातील ३१८ जनावरांचा जीव वाचविण्यास यश आल्याने आम्हास आनंद वाटत असल्याचे मत दौंडचे पशुधन विकास अधिकारी बाळासाहेब गायकवाड यांनी दिले.शुक्रवारी (दि. २४) मलठण येथील प्रकल्पातील संकरित १0 गाई, ७ संकरित वासरे, १७ म्हशी अशी एकूण १९५ जनावरे भोसरी येथील पूना पांजरपोळ ट्रस्टला स्थलांतरित करण्यात आली. तर खानवटे (ता. दौंड) येथील जय द्वारकाधीश गोशाळेत देशी गाई ९, देशी नर २, देशी वासरे ४ अशी एकूण १५ जनावरे स्थलांतरित करण्यात आली. तर आज २ गायी, ३ रेडे अशी एकूण ५ जनावरे मृत्युमुखी पडली असून, १३ जनावरे अंत्यावस्थेत पडून आहेत. त्यांच्यावर मलठणचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. राहुल हगारे उपचार करीत आहे. त्यामुळे आजअखेर ४३ जनावरे दगावली आहेत. जनावरांच्या स्थलांतरात आणि देखभालीत रावणगावचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मेरगळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मोलाची मदत मिळाली. आज दौंडचे पशुधन विकास अधिकारी बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण दौंड तालुक्याचा पशुसंवर्धन विभागातील एकूण ५0 डॉक्टर आणि परिचर यांनी बुधवारपासून सलग तीन दिवस जनावरांना औषधोपचार करणे, त्यांना चारा उपलब्ध करून देणे, मिळालेला चारा जनावरांना खाऊ घालणे, मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे अंत्यसंस्कार करणे आणि महत्त्वाचे म्हणजे जनावरांचे स्थलांतर करणे यात मोठी मेहनत घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मलठणचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. राहुल हगारे आणि खडकीचे पशुधनविकास अधिकारी डॉ. शांतिलाल आटोळे यांनी सोमवार ते शुक्रवार सलग पाच दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन जनावरांना औषधोपचार, चारापाणी व स्थलांतर यामध्ये जबाबदारी निभावली. (वार्ताहर)
मलठण येथील ३१८ जनावरांचे वाचले प्राण
By admin | Published: June 25, 2016 12:39 AM